"सोबत"
कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.
प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
"स्वतःला काय हवं आहे?"
हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'
पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...
मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
"आपण एकटेपणाला घाबरतो."
सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.
मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.
लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....
गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो.
नातेवाईकांशी बोलणे म्हणजे काही काम असेल तर किंवा फक्त काही चांगले किंवा वाईट प्रसंग घडले तरच, आपल्यापैकी किती जण फक्त उगीच आठवण आली म्हणून नातेवाईकांकडे जाऊन येतात? आणि हल्ली तर सगळेजण इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे जाताना देखील आज घरी आहेत का? वेळ आहे का , कुठे बाहेर तर नाही ना जाणार हा सगळा सोपस्कार करून जावे लागते, असा सोपस्कार ना करता जर आपण कुठे जाऊ शकत असू तर ठीक त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते.
आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.
मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. नाहीतर मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.
मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
"सोबत"...!
थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत. आणि सोबत छंदांची जोड.
सागर नाईकडे