Tuesday, 1 March 2016

अताशा असे हे मला काय होते

आपलं आपलं असं सगळं मस्त चाललं असतानाच असं काय आहे, जे इतकं त्रास देतंय?....
छे छे, आपण दु:खात, त्रासात आहोत याचा आनंद कोणी उपभोगत असेल तर आपण का बरं असा आनंद द्यायचा  त्यांना?.... नाही म्हटलं तरी मान्य करायलाच पहिजे की जखम खोल आहे, आतपर्यंत गेलेली रूतन बसलेली.....
पण का ठेवायच्या अशा फ़ुकट जखमा?....लोकांच काय आहे? आज जरी आयुष्यात आहेत उद्या नक्की आहेत का ?...काल परवा जी होती ती तरी आज कुठे आहेत?....ते दिवस गेले, हेही जातीलच....हा सगळा त्रास का? ही अस्वस्थता का?
सगळं काही ठीक असताना मनाची शांतता, समाधान गेलं कुठे? कोणीतरी म्हणजे अगदी शब्दश: कोणीतरी ज्यांचा आपल्या आयुष्याशी काहीएक संबंध नसतो अशी माणसं आपलं सुख, मनाची शांतता अशी ओरबडून घेऊन निघून जातात आणि आपणही उसासे सोडत बसावं?..... असं नेमकं काय झालंय की रोजच्या दिवसातला आनंद हरवून गेलेला आहे......
आनंद तुमच्या हातात आहे. तो कोणीही तुमची इच्छा नसताना हिरावून घेऊ शकत नाही, असली फ़िलॉसॉफ़ील कोट्स वाचताना एकाचवेळेस आतून बरं वाटत असतं..... पण ते तेवढ्या पूरतच.
माझी हक्काची माणसं, त्यांच्या आयुष्यात माझ्या असण्यानं खुष असतानाही अशी वैतागवाणी माणसं माझ्या आयुष्यात असण्यानं इतका का फ़रक पडावा?.....नकोच पडायला खरं तर...फ़रक पडतो हेही खरंच....गेले काही दिवस.... नव्हे महिने, या परिस्थितीतून जात असताना स्वत:शी वारंवार विचारलेला, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला हा प्रश्न,  "अताशा असे हे मला काय होते ?".....
आहे काही उत्तर?
लोक असे का वागतात? त्यांच्या वागण्याचा त्रास आपल्याला काहीएक कारण नसताना का होतो? आपल्या चांगुलपणाचा फ़ायदा घेत रहाण्याचा अघोरीपणा करून यांना नेमकं कोणतं सुख मिळतं?...थोडा निर्ढावलेपणा यायला हवा....दूर्लक्ष करता येण्याइतका...गेलात उडत म्हणण्याइतका......

स्वतःचे वागणे हे इतकेच आपल्या हातात असते अश्या निष्कर्षावर मी आलो  आहे....अनेकांच्या अनेक तऱ्हा आणि खरेतर जगात तऱ्हेवाईकपण बरंच आढळते.... आपण कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही.... आकाशातल्या  पावसाळी ढगांचे जसे सांगता येत नाही तसेच स्वभावाचे पण सांगता येत नाही...

अनेक वेळा घोर लावून जातात अनेक प्रसंग, आणि मग, "अताशा असे हे मला काय होते "...अस वाटू लागते...

सागर नाईकडे

1 comment:

  1. Chaan aahet vichar mitra..


    Keep writing..


    Keep doing..

    ReplyDelete